saur pump केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या क्रमवारीत महावितरण कंपनीने देशात प्रथम स्थान पटकावले आहे. १०० पैकी ९३ गुण मिळवून केलेल्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणचे अभिनंदन केले. त्याचबरोबर, त्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या निकषांमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बदल करण्याच्या सूचनाही दिल्या.
saur pump सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार महाजनको, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेतील बदलांवर भर दिला. अनेक शेतकरी या योजनेतील निकष बदलण्याची मागणी करत आहेत, ही बाब लक्षात घेऊन ऊर्जा विभागाने तातडीने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीला महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांसोबत समन्वय साधून कामाला गती देण्याचे आवाहन केले. महापारेषण कंपनीने चालू आर्थिक वर्षात अंदाजे १८०० कोटी रुपयांचा नफा मिळवून चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी यापुढेही सातत्य राखत अधिक उत्तम कामगिरी करण्याची आशा व्यक्त केली.
